शब्दांकन : अरुण पुराणिक , रविवार २९ मे २०११
संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्वाच्या सुरेल आठवणी जागविणारा लेख-
ज्यांच्या नावाचा पुरस्कार घ्यायला फिल्मी उद्योगातील अतिरथी-महारथी धन्यता मानतात, आयुष्याचे सार्थक समजतात त्या कलामहर्षी दादासाहेब फाळके यांच्या कलागुणांनी असामान्य कर्तृत्वाने परेश मोकाशी झपाटले गेले आणि त्यातूनच ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी‘ या असामान्य कलाकृतीचा जन्म झाला.
तशीच काहीशी अवस्था बालगंधर्वाचे चरित्र वाचून सुबोध भावेंची झाली असावी.अभिनेता सुबोध भावे आणि कला-दिग्दर्शक नितीन देसाईंनी ‘बालगंधर्व‘ची निर्मिती करून गंधर्व युगाला पुनश्च उजाळा दिला. अशा प्रसंगी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचा निर्माता, रंगदेवतेचा राजहंस म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या बालगंधर्वाच्या सुरेल आठवणी जागविण्याचा मोह टाळता येत नाही.
माझे चुलत आजोबा जगन्नाथबुवा पंढरपूरकर हे गंधर्व कंपनीच्या स्थापनेपासून १९२५ सालपर्यंत गंधर्व कंपनीत नायकाच्या भूमिका करीत असत. कंपनीत दाखल होण्यापूर्वी ते पुण्याला पर्वतीवर कीर्तन करीत असत. ‘स्वयंवरा‘तील भीष्मक आणि ‘द्रौपदी‘तील दुर्योधन या भूमिका त्यांच्यासारख्या सुरेख आजवर कुणी केल्या नाहीत, असे जुने-जाणते लोक सांगत. त्यांच्या असामान्य गायकीची कल्पना येण्यासाठी काही वर्षांपूर्वी विद्याधर गोखलेंनी ‘बोल होईल फोल‘ व ‘व जा भय न मम मना‘ या दोन ध्वनिमुद्रिका पुनर्मुद्रित केल्या आहेत। त्यांनी नारायणरावांच्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. माझे सख्खे आजोबा शंकरबुवा पुराणिक (पंढरपूरकर) हे नारायणरावांचे गुरुबंधू! हे दोघेही भास्करबुवा बखले यांचे ज्येष्ठ शिष्य! बालगंधर्वाच्या उतारवयात माझे वडील हरिभाऊ पुराणिक त्यांना ऑर्गनवर साथ करीत असत. त्यांनी गंधर्वाच्या अनेक सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमात ऑर्गन वाजविले आहे. त्या वेळच्या या जपून ठेवलेल्या आठवणी पंढरपूरकर बुवांच्या शब्दांत- बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किलरेस्कर, म्हणजे महाराष्ट्र संगीत नाटय़कलेचे उत्पादक !
१८८१ मध्ये किलरेस्कर संगीत मंडळीची स्थापना करून पाच वर्षांत त्यांनी नाटय़कलेत मोठी क्रांती करून सोडली. नाटकांचे पूर्वस्वरूप पार बदलून, कवी, गाणारे व ग्रंथकार यांना उदयास आणले.समाजात त्यांनी एक नवी करमणूक उत्पन्न केली.पूर्ववयात, ‘अल्लाउद्दीनाची चितुर शहरावर स्वारी‘ व ‘शंकर दिग्विजय‘ ही दोन गद्य नाटके, नंतर ‘शाकुंतल‘, ‘सौभद्र‘ व ‘रामराज्यवियोग‘ अशी अत्यंत लोकप्रिय झालेली तीन संगीत नाटके लिहिली।
किलरेस्कर संगीत मंडळींतील मोरोबा वाघुलीकर, बाळकोबा नाटेकर आणि भाऊराव कोल्हटकर या
रंगभूमीवर जणू मूर्तिमंत रंगदेवता असत. हे गायक-नट गावयास लागले म्हणजे नागाप्रमाणे लोकांस डुलवीत होते. भास्करबुवा बखले किलरेस्कर मंडळीच्या पहिल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत प्रमुखांपैकी नट होते. नारायणराव बालगंधर्व हा किलरेस्कर संगीत मंडळीनी नाटय़ रसिकांना दिलेला नजराणा होता.
त्यांच्याविषयी बुवा लिहितात, ‘नारायण श्रीपाद राजहंस यांचे गाणे शास्त्रोक्त व मोहक असून, सौंदर्य व कंठमाधुर्यामुळे यांना बालपणापासून ‘बालगंधर्व‘ असे म्हणतात. यांच्या ‘सौभद्र‘, ‘मूकनायक‘ इत्यादी नाटकांतील नायिकेच्या भूमिका वाखाणण्यासारख्या होतात.‘ सन १९००च्या दरम्यान नारायण जोगळेकर किलरेस्कर कंपनीत आले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी ते पुण्यास येऊन राहिले. याच सुमारास भाऊरावांची प्रकृती बिघडून ते आजारी पडले. किलरेस्कर कंपनी लयास जाण्याची भीती होती.
अशा वेळी या जोगळेकरांनीच खूप मदत केली. ते कंपनीचे मुख्य नायक आणि चालक बनले। मात्र १९११ च्या दरम्यान यांच्या मृत्यूनंतर किलरेस्कर संगीत मंडळीत फूट पडली. बालगंधर्व तिथून बाहेर पडले. गंधर्वयुग म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेले गोड स्वप्न आहे, असे मानले जाते. बालगंधर्वाच्या गंधर्व कंपनीची स्थापना मुंबईच्या ग्रॅण्ट रोड नाक्यावरील एल्फिन्स्टन थिएटरमध्ये (सध्याचे न्यू रोशन टॉकीज) ३ सप्टेंबर १९१३ रोजी झाली व ‘संगीत मूकनायका‘चा प्रयोग इथेच दृष्ट लागण्यासारखा रंगला.
त्या काळात गंधर्व, ललित कलादर्श, बळवंत, यशवंत, बालमोहन, आनंद संगीत, मुंबई नाटिका, रेडिओ स्टार, रंगबोधेच्छू, नाटय़कला प्रवर्तक आदी नाटक कंपन्या ग्रॅण्ट रोडच्या पिला हाऊस परिसरात नाटय़प्रयोग करीत असत. परंतु एल्फिन्स्टन हे गंधर्वासाठीच कायम राखीव असे. सोनेरी वर्खाची अक्षरे असलेला गंधर्व कंपनीचा फलक मोठय़ा दिमाखाने एल्फिन्स्टनवर झळकत असे. थिएटरबाहेरच्या कमानीखालच्या फूटपाथवर, शोच्या आधी चिऽऽस आवाज करीत फुटणाऱ्या, फसफसत बाहेर येणाऱ्या गोटी सोडा-लेमनच्या बाटल्या, कागदाच्या सुरनळीतून इंडियन पिस्टा म्हणून विकले जाणारे शेंगदाणे, तिखट-मीठ लावलेल्या ओल्या काकडय़ा असा थाट असे.
बालगंधर्वाचा स्वत:चा खास चाहता वर्ग होता. लिया-दिया करत शेअर बाजार, बुलियन कट्टा
येथे हजारोंचा सट्टा खेळणारे शेटजी, भाटिये, खोजे, तसेच नामांकित वकील, डॉक्टर्स, बाहेरगावचे राजे-महाराजे, जहागीरदार, शेठ-सावकार ‘तारवाणी‘ झाली की (अंधार पडल्यावर) खास व्हिक्टोरिया, बग्गी करून रात्रीच्या खेळाला हजेरी लावत असत.
त्या काळात संगीत दुथडी भरून वाहत होते. ध्वनिक्षेपक नव्हते. भले मोठे सभागृह क्वचितच असे. परिणामी गवई, कलाकार व श्रोते यांची जवळीक होती. वेळेचे फारसे बंधन नव्हते, त्यामुळे सूर लावण्यापासून बढत करण्यात चैन असे. मराठी नाटय़विश्वात न भूतो न भविष्यती ठरलेला ऐतिहासिक महत्त्वाचा ‘संयुक्त मानापमान‘चा प्रयोग दुमदुमला तो मुंबईत ग्रॅण्ट रोडच्या बालीवाला थिएटरमध्येच! आणि तो दिवस होता ८ जुलै १९२१. धैर्यधर संगीतसूर्य केशवराव भोसले तर भामिनी स्वरचंद्र नारायणराव राजहंस! १९२१ साली बालीवाला थिएटरमध्ये झालेल्या या प्रयोगाच्या पहिल्या वर्गाचा तिकीट दर होता शंभर रुपये! तरीदेखील हा प्रयोग १५ दिवस अगोदरच हाऊसफुल्ल झाला होता.
सायंकाळी साडेसात वाजता ‘मानापमान‘ची नांदी निनादली आणि ‘घ्या हो पदरी सख्या मजला‘ म्हणत भामिनीने धैर्यधराच्या गळ्यात वरमाला घातली तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. केशवराव व बालगंधर्वाच्या प्रत्येक पदाला सात-आठ वेळा वन्स मोअर मिळत होते. रसिक संगीताच्या शीतल चांदण्यात अखंड न्हाऊन निघत होते. तिकिटे न मिळालेले शेकडो रसिक निराश न होता थिएटरच्या बाहेर फुटपाथवर सात तास पावसाच्या पाण्यात भिजत, कानात प्राण एकवटून त्या स्वर्गीय संगीताचा
आस्वाद घेत होते. महात्मा गांधींनी चालू केलेल्या ‘लोकमान्य टिळक स्वराज्य फंडा‘ला या एका प्रयोगाने त्या काळात तब्बल १७ हजार रुपये मिळवून दिले।या काळात मराठी संगीत रंगभूमी वैभवाच्या आणि लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होती. त्या कालखंडात पंढरपूरकर बुवांनी माझ्या आजोबांनी जे काही पाहिले, अनुभविले, त्या आठवणी पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठराव्यात म्हणून जतन करून ठेवल्या।किलरेस्कर, देवलांनी स्वत:च चाली निवडून प्रासादिक पद्यरचना केली. खाडिलकरांना संगीताचे ज्ञान नसल्यामुळे, गायकांनी त्यांना चाली पुरविल्या व नाटककाराने त्या चालींवर पद्यरचना केली.
त्या काळात ‘एकच प्याला‘ नाटकासाठी विठ्ठल गुर्जरांनी रचलेल्या ‘बघू नको मजकडे केविलवाणा
राजस बाळा‘ या पदाचा, गोविंदराव टेंबे यांच्या ‘राम रंगी रंगले मन‘ या पदाचा गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल! ‘राम रंगी रंगले मन‘ हे गीत म्हणजे एखाद्या संत कवीचीच रचना आहे, असा बालगंधर्वाचा समज होता.
बालगंधर्वाचा आवाज अलौकिक होता. त्यांच्यानंतर विनायकबुवा पटवर्धन नायकाच्या भूमिका करू
लागले. ‘सावित्री‘ नाटकातील सत्यवानाची त्यांची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.हार्मोनियमऐवजी ऑर्गन आणि त्याला दोन सारंग्यांची जोड अशा साथीची सुरुवात बालगंधर्वानी १९२० च्या दरम्यान केली. गंधर्व मंडळीतील कुशल वाद्यवादक म्हणून राजण्णा रबकवी या तबलजीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ‘संयुक्त मानापमान‘च्या ऐतिहासिक प्रयोगाच्या वेळी तबल्याच्या साथीला राजण्णाच बसले होते. गंधर्व मंडळीत, कुशल हार्मोनियम व ऑर्गन वादनात केशवराव कांबळेंना तोड नव्हती. कादरबक्ष सारंगीये व थिरकावां तबलजी म्हणून गंधर्व मंडळीत असतानाही संबंध साथीचे नियमन स्वत: केशवराव कांबळे करीत। कादरबक्ष आणि अहमदजान थिरकावां असामान्य कलाकार होते. नाटकाची साथ आणि
गाण्याच्या मैफिलीची साथ यांतील फरक समजायला या प्रतिभावंतांना वेळ लागला नाही.
बालगंधर्व ‘एकच प्याला‘ नाटकात, दळण दळताना, ‘चंद्र चवथीचा रामाच्या गं बागे मध्ये
'चाफा नवतीचा‘ ही ओळ म्हणत, त्यावेळी कादरबक्षाच्या सारंगीची मुलायम साथ ते घेत असत।‘स्वस्थ कसा तू उठ गडय़ा‘ या पदाच्या वेळी, सिंधूच्या अबोल मुलाबरोबर थिरकावां साहेबांच्या तबल्याचे बोलसुद्धा तसाच लाडीक संवाद करीत. ‘कान्होपात्रा‘ नाटकातील ‘अवघाची संसार‘ या प्रासादिक भजनामुळे गंधर्वाचे अर्धे कर्जे फिटले होते.
माझे वडील हरिभाऊ पुराणिक वयाच्या पाचव्या वर्षांपासून गणपतबुवा पुरोहितांकडे हार्मोनियम
वादन शिकले होते.त्यांना गंधर्वाचा सहवास लाभला होता व त्यांच्या गायकीचा अभ्यास करण्याची संधीही मिळाली होती. गंधर्वाच्या उतारवयात हरिभाऊ पुराणिक वयाच्या फक्त अठराव्या वर्षी त्यांना ऑर्गनवर कुशल साथ करीत. त्यांनी बालगंधर्वाच्या जागविलेल्या काही खास आठवणी.. त्यांच्याच शब्दात..
बालगंधर्व म्हणजे रेखीव रूप, अत्यंत मधुर आवाज, सरस अभिनय! त्यांचे गाणे म्हणजे ताल-लयीचा अत्यंत पक्केपणा, सुरांचा लडिवाळपणा आणि स्त्रीसुलभ नाजूक आविष्कार! नारायणरावांच्या गाण्यांनी भले भले गवई प्रभावित झाले. अल्लादिया खांनीसुद्धा आनंदाश्रूंनी नारायणरावांना दाद दिली. भास्करबुवांनी त्यांच्याकडून ‘रुक्मिणी स्वयंवरा‘ची गाणी बसवून घेतली. आपल्या दर्जेदार चिजांचा उपयोग त्यांच्याकरवी नाटय़संगीतात केला. गोविंदराव टेंब्यांनी त्यांच्याबरोबर कंपनीत पार्टनरशीप केली. मास्तर कृष्णराव यांनीसुद्धा त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्याबरोबर दुय्यम भूमिका करण्यास मागेपुढे पाहिले नाही. हे काय दर्शविते?
याचा अर्थ त्यांना आवाजाची ईश्वरदत्त देणगी तर होतीच, पण त्याचबरोबर स्वकष्टाने, परिश्रमाने, अभ्यासाने व सौंदर्यदृष्टीने त्यांनी त्यात परिपूर्णता आणली होती. त्यांच्या थोडा काळ आधी भाऊराव कोल्हटकर मुख्य स्त्री भूमिका करत. त्यांच्या धारदार आवाजाचा पल्ला मोठा होता. साकी, दिंडी, आर्या यांसारख्या गानपद्धतीत त्यांना तोड नव्हती. त्यांचे गुरू भास्करबुवासुद्धा स्त्री-पार्ट रंगवीत असत. या अशा पाश्र्वभूमीवर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करून श्रोत्यांच्या मनावर आपल्या गायकीचा ठसा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या मागेपुढे, समकालीन काळातसुद्धा चांगल्या दर्जाचे स्त्री-पात्री गवई होते.
तेही त्यांच्या परीने परिणामकारक होते. तरीही सर्वतोपरी किंचित का होईना, नारायणराव सरस ठरले.
नारायणरावांचा आवाज गोड होता, शंकरराव सरनाईकांचा आवाज तर बासरीसारखा मधुर होता, पण नारायणरावांचे गायकीचे मर्म त्यांच्या स्वर लावण्यात व शब्द उच्चारण्यात दडलेले होते. गाणं हे गळ्याचे नसून हृदयाचे होतं। त्यामध्ये भावना प्रदर्शित करण्याचे अफाट सामथ्र्य होते.
सूर गोल परिपूर्ण असे म्हणजे गाण्यात अवघड सूर हलणे हा प्रकार नसे. शब्दसुरात कुठेही लंगडेपणा नसे.गंधर्वाच्या गायकीचे वैशिष्टय़ म्हणजे ते निरनिराळी पदे त्या गाण्याच्या पल्लयाप्रमाणे निरनिराळ्या पट्टीत गात (‘संयुक्त मानापमाना‘च्या प्रयोगाच्या वेळी या पट्टी बदलण्यावरून थोडासा गोंधळ निर्माण झाला होता.) याचा परिणाम म्हणून गाणे रुक्ष, ओढूनताणून गायल्यासारखे वाटत नसे. शब्द व सूर यांची सांगड नारायणराव उत्कृष्ट घालत. ताल सांभाळून, शब्दांना न मोडता, अर्थभंग न करता ते शब्द भावना निर्माण करण्यास वापरत. उदा. ‘बघू नको मजकडे केविलवाणे‘ यात ‘बघु नको‘ मध्ये आर्तता असे व ‘केविलवाणे‘ म्हणताना, मध्यमावरून ऋषभावर येताना, जो सुरांचा आभास असे, ते फक्त ऐकताना समजून येण्यासारखे आहे. निरनिराळ्या तऱ्हेने गाण्यातील एखादी जागा घेताना रस परिपोषकता ही त्यांची खासियत असे।
रागांची मर्यादा ते केवळ सौंदर्य वाढविण्याकरिता उल्लंघत असत. ताना म्हणजे गवय्याची ताकद व
जोर आजमावयाचा नसून रसनिर्मितीसाठी त्याचा उपयोग करून घ्यायला हवा, असे त्यांचे विचार असत. नारायणरावांनी त्यावेळच्या सर्व गानपद्धतींचा जाणकार हेतूने सखोल व परिपूर्ण अभ्यास केला होता. उदा. धारवाडी पद्धतीने आवाज मोकळा, स्वच्छ, सुस्पष्ट लावण्याची पद्धत, ठुमरी गाण्याची उत्तर हिन्दुस्थानी पद्धत, बायकांच्या गाण्याचा अभ्यास तसेच महाराष्ट्रातील तमाशा पद्धतीत आढळणाऱ्या तानांच्या लडी ते सहजपणे घेत. भरदार व जोरदार-दमदार ख्य़ाल गायकीचे गाणे त्यातील रुक्षपणा काढून गोड भूमिकेला पोषक पद्धतीने गात. उदा. ‘अजी लागे हृदयी‘, ‘अमृताची गोपाला‘ इत्यादी.
शेवटी संगीत नाटक ही सादरीकरणाची कला (परफॉर्मिंग आर्ट) आहे, याची जाणीव त्यांना पूर्णपणे होती. तेव्हा या कलेत परिपूर्णता आणून ती लोकप्रिय करण्यात नारायणरावांचा सिंहाचा वाटा आहे. लोकमान्य टिळकांनी नारायणरावांना ‘बालगंधर्व‘ ही पदवी त्यांच्या बालपणीच प्रदान केली, पण संगीत तपश्चर्या, अभ्यास आणि सौंदर्यदृष्टी या गुणांच्या बळावर ते पुढे गानमहर्षी झाले.
मराठी संगीत रंगभूमीवरील सुवर्णकाळाचा निर्माता म्हणूनच शेवटी ते आपली ओळख ठेवून गेले. ‘बालगंधर्व‘ या शब्दातच ही विलक्षण जादू भरलेली आहे।
No comments:
Post a Comment